लिंगेश्वर डॉट कॉमवर आपले स्वागत !!!
सह्याद्रीच्या कुशीत विसावलेले व उंच उंच पर्वत रांगांच्या सानिध्यात असलेले परंतु पवित्र अशा मुळा नदीच्या तीरावर वसलेले अतिशय निसर्गरम्य परिसर लाभलेले म्हणजे श्री.लिंगेश्वर महादेव देवस्थान मंदिर होय. लाखो लोकांचे श्रद्धास्थान असल्यामुळे येथे दररोज शेकडो व वर्षभर हजारो यात्रेकरू येत असतात.
भरपूर पाणी, मोकळी प्रशस्त जागा, स्वच्छ व आरोग्यदायक हवा असल्याने या पर्यटन क्षेत्री यात्रेकरू खूप आनंदी व समाधानी असतात. श्री भगवान लिंगेश्वर महादेव हे स्वयंभू व अपरिमित असे जागृत व जाज्वल्य देवस्थान आहे. सर्वच यात्रेकरूंना याचा अनेक वर्षापासून अनुभव आलेला आहे. श्री.लिंगेश्र्वरास सोडलेले संकल्प पूर्णत्वास गेल्याची इतिहास काळापासून अनेकांना खात्री पटली आहे.शहाजीराजे यांचे श्रद्धास्थान मूळ स्वयंभू असलेले भगवान श्री.लिंगेश्वर महादेव हे मराठ्यांचे इतिहास काळापासूनचे श्रद्धास्थान आहे. शहाजीराजांनी अनेकदा स्वराज्य स्थापनेचा प्रयत्न केला.परंतु तो यशस्वी झाला नाही. स्वराज्य स्थापनेचा हा संकल्प शहाजीराजांनी प्रथम श्री.लिंगेश्वर महादेव मंदिरातच केला.या प्रयत्नास जरी यश आले नाही तरी छत्रपती शिवाजी महाराजांना या प्रयत्नातून स्वराज्य स्थापनेची प्रेरणा मात्र मिळाली शिवाजी महाराज स्वराज्य स्थापनेच्या कार्यात यशस्वी झाले.
श्री. लिंगेश्वर देवस्थान एक समाजाभिमुख व पुरोगामी संस्थान :
कोणतीही संस्था म्हटले की तीला उद्दिष्टये आली, हेतू आला, संचालक आले, कार्यक्षेत्र आले, परंतु आपल्या समाजात अशा अनेक संस्था आहेत की, त्यांच्या स्थापनेचा हेतू व त्यांचे प्रत्यक्ष कार्य, वास्तव स्वरूप यांचा काही ताळमेळ बसत नाही. अनेक संस्था केवळ संचालक निवडून येण्यासाठीच असतात. निवडणुकी नंतर संचालक कार्य विसरून जातात. व ती संस्था केवळ नावापुरतीच शिल्लक राहते. अलीकडे शहरा प्रमाणे खेड्यातही अनेक लहान मोठ्या संस्था कार्यरत आहेत. ग्रामपंचायती, विकास सोसायट्या, दुधसंस्था, पतसंस्था, शिक्षणसंस्था या प्रत्येक खेड्यात आहेतच. परंतु देवस्थान संस्था खेड्यात क्वचितच पाहायला मिळतात. मोठमोठी स्थान-महात्मे असणारी देवस्थानेही संबंधितांचे लक्ष नसल्याने वाईट अवस्थेत पहायला मिळतात, परंतु काही गावांमध्ये देवस्थान संस्था कार्यरत असून त्यांचा कारभार व कार्य खूपच चांगल्या तऱ्हेने चाललेला आढळतो. शिर्डी येथील साई संस्थान, शेगाव येथील गजानन महाराज संस्थान, देवगड नेवासा येथील दत्त महाराज देवस्थान अशी काही आदर्श संस्थानांची नावे घेता येतील. अर्थात कोणतीही संस्था ही संस्थेत काम करणारे संचालकमंडळ, यांच्यावरच अवलंबून असते. संस्था स्थापन केली म्हणजे आपोआप चालत नाही. त्या संस्थेची माणसे ध्येयवेडी असावी लागतात.
आमच्या लिंगदेव ता. अकोले जि.अहमदनगर येथील श्री. लिंगेश्वर महादेव व मारुती देवस्थान ट्रस्ट, लिंगदेव ही अशीच एक खेडयातील धार्मिक संस्था कार्यरत आहे. सन.१९७५ साली लिंगदेव ग्रामस्थांनी एकत्र बसून स्थापन केली. ही संस्था जरी धार्मिक असली तरीही मा.ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, सावित्रीबाई फुले, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज यांचे आदर्श विचार समोर ठेवून आम्ही या संस्थेची वाटचाल सुरु ठेवली. याबाबत आम्हाला यशही संपादन करता आले. त्यातील काही ठळकबाबी येथे सांगणे योग्य वाटते.
संपन्न होत असलेले उत्सव :-
.......................................................................................................................................................................................
- लिंगेश्वर महादेव यात्रा उत्सव
(गुढीपाडवा)-३ दिवस. - रामनवमी- १ दिवस.
- हनुमान जयंती- १ दिवस.
- श्रावणमास उत्सव
(सव्वा लाख बिल्वदल पूजा)- ३० दिवस. - नागपंचमी- १ दिवस.
- गोकूळअष्टमी- १ दिवस.
- गणेशोत्सव -१० दिवस.
- नवरात्र उत्सव- ९ दिवस.
- विजयादशमी(दसरा)- १ दिवस.
- दिपावली-दिपोत्सव – ५ दिवस.
- महाशिवरात्री उत्सव – १ दिवस.
- अखंड हरिनाम सप्ताह – ८ दिवस.
- होळी उत्सव - १ दिवस.
- धुलीवंदन - १ दिवस.
- सामुहिक विवाह सोहळा –
वर्षामधून २ वेळा. - आरोग्य शिबिरे वर्षामधून ३ ते ४ वेळा.
- महारुद्रपूजा कार्यक्रम – १ दिवस.
श्रावणात दर सोमवारी विशेष यात्रा भरत असते. त्याचप्रमाणे या महीन्यात भाविकांची दर्शनासाठी दररोज गर्दी असते. त्याचप्रमाणे या महीन्यात सव्वा लाख बेलपत्रांनी श्री. लिंगेश्वर महादेवाची पुजा केली जाते.या महीन्यात सुमारे ५० हजारा पेक्षा अधिक यात्रेकरू भक्तिभावाने दर्शनासाठी येतात.